देश आणि विदेशात अनेक मल्लांशी भिडत लाल माती आणि मॅटवर अस्मान दाखवणारे रुस्तुम ए हिंद आणि महान भारत केसरी पैलवान दादू चौगुले (Dadu Chaugale) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दादु चौगुले यांना काही दिवसापूर्वी धाप लागल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर दादु चौघुले हे उपचार दरम्यान कोमात गेले होते. परंतु, आज 20 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरचे महान कुस्तीपटू अशी ओळख मिळवणारे दादु चौघुले यांची दुपारच्या सुमारास प्राणज्योत मावळली.
दादू दत्तात्रय चौगुले यांनी कोल्हापुरात हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले आहेत. दादू चौगुले यांनी 3 मार्च 1973 रोजी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘रुस्तम-ए-हिंद’ हा मानाचा किताब पटकावला होता. त्यानंतर 3 एप्रिल 1973 ला नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘महान भारत केसरी’ हा किताब पटकावला होता. दादू चौगुले यांनी 1970 मध्ये पुणे येथे तर 1971 साली आलिबाग येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब पटकावला होता. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी गेल्या वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्यानचंद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. न्यूझीलँडच्या ऑकलँड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावले होते.