कोल्हापूर: बाइक आणि टेम्पो च्या धडकीने भीषण अपघात; 3 जण ठार
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

रविवारी 17 नोव्हेंबर रात्री 9. 30  च्या सुमारास सांगली (Sangali) बायपास येथील जैनापूर (Jainapur)  याठिकाणी टेम्पो आणि मोटारसायकल यांच्या धडकीने एक भीषण अपघात (Accident) झाल्याचे समजत आहे. यामध्ये तीन तरुणांना आपला प्राण गमवावा लागला. माध्यमांच्या माहितीनुसार या मृतांची नावे ही गुणपाल रोजे (27), सुहास कोठावळे (26) आणि विपूल रमेश पाटील ऊर्फ अजिंक्य अशी आहेत. यापैकी एक जण शिरोळ (Shirol) तालुक्यात तर अन्य दोघे हे हातकणंगले (Hatkanangle) येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असून टेम्पो चालक सध्या फरार आहेत. (गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन; अमेरिकेहून घरी परताना मुंबई-नाशिक महामार्गावर अपघाती मृत्यू)

कोल्हापूर-सांगली बायपास रस्त्यावरून टेम्पो (MH 13 AX 2682 ) कोल्हापूरच्या दिशेने जात होता. यावेळी जैनापूर येथे बाईक (MH 09 DT 5624) आणि टेम्पो मध्ये धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती, की बाईक सरळ टेम्पोच्या पुढील भागाला धडकून अडकून पडली. यावेळी बाइकवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने गुणपाल रोजे व विपुल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर, सुहास कोठावळे बाईकच्या मागे बसला असल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. याबाबत माहिती मिळताच लगेचच सुहास याला रुग्णवाहिकेतून सांगली येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथवर पोहचण्याचा आधीच वाटेत त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, अपघात होताच टेम्पो चालकाने लगेचच घटनास्थळातून पळ काढला, पोलीस सध्या या प्रकरणी तपास करत आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता वेगमर्यादेचे पालन न करणाऱ्या टेम्पो चालकावर किंवा मोटारसायकलवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांवर आरोप लागवता येऊ शकतो हे अजून स्पष्ट झालेले नाही.