Kolhapur | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीसोबतच मागील 2-3 दिवसांपासून मध्य भागात देखील पाऊस धुमशान घालत आहे. जोरदार वार्‍यासह अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. दरम्यान कोल्हापुरात देखील अशीच परिस्थिती आहे. सतत कोसळणार्‍या पावसाने कोल्हापुरामध्ये पुन्हा यंदाच्या वर्षी देखील पुराचा धोका संभावत आहे. प्रशासनाला आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान आज (5 ऑगस्ट) तालुका अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरामध्ये राजाराम धरण आता धोक्याच्या पातळीच्या पलिकडे वाहत आहे. यामुळे अनेक गावांत पाणीच पाणी झाले आहे. सध्या जलमय झालेल्या कोल्हापुरामध्ये वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या 34 रस्ते आणि 9 राज्य महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ANI Tweet

कोल्हापूरामध्ये पंचगंगा नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याने त्याच्या आजुबाजूच्या भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज कोल्हापुरामध्ये 4 एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नदी किनारी असणार्‍या अनेक गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू झालं आहे. दरम्यान कोल्हापुरासोबतच सातारा, सांगलीमध्येही पावसाचा जोर अधिक आहे.