
महाराष्ट्र आणि देशात देखील मान्सूनचे आगमन उशीराने झाल्यानंतर जुलै महिन्यात काही प्रमाणात मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली होती. यानंतर ऑगस्ट महिन्याचे 15 दिवस उलटून देखील मराठवाड्यात (Marathwada) जोरदार पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी तर गेल्या 20 दिवसांत काहीच पाऊस न झाल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. पाऊस न झाल्यावे पाणीसाठा (Water Storage) हा आता खूपच घटला आहे. यामुळे मराठवाड्यात पाण्याची चिंता वाढली आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी (Jayakwadi) धरणात केवळ 34.11 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी आजच्या दिवशी याच जायकवाडी धरणात 94.99 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. (हेही वाचा - Maharashtra Rain Forecast: शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; राज्यात उद्यापासून पाऊस पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज)
पाणीसाठा कमी झाल्याने मराठवाडा विभागात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात सध्या 57 गाव आणि 22 वाड्यावर 84 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सात शासकीय आणि 77 खाजगी टँकरचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात 27 गावं आणि 18 वाड्यांवर एकूण 43 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
नांदेड जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने पाणीसाठा खूपच कमी झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी नसल्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होताना दिसत आहे.
दरम्यान राज्यात दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पाऊस उद्यापासून पुन्हा सक्रीय होणर असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.