
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकाताच आपला निर्णय देताना एनसीपी पक्ष आणि पक्ष चिन्ह अजित पवारांकडे दिले आहे. आगामी निवडणूकीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) निवडणूकीच्या रिंगणात दिसू शकतात अशी चर्चा सध्या रंगत आहे. दरम्यान अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा फोटो असलेल्या सुनेत्रा पवार यांना विजयी करावं, अशा आशयाचं एक पोस्टर बारामतीच्या (Baramati) कार्हाटी गावामध्ये लावण्यात आलं होतं. शेती फर्मच्या मालकाने लावलेल्या पोस्टरवर शाईफेक करण्यात आली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ही शाईफेक झाली आहे. दरम्यान शाईफेक झाल्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आलं आहे.
बॅनर वर सुनेत्रा पवार यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आला होता. एका शेती फार्मच्या मालकाने सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता. अजित पवार त्यांच्या पक्षातून बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. अद्याप यावर अजित पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही पण त्यांच्या उमेदवारीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वीरधवल जगदाळे यांनी काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे केली होती. वीरधवल जगदाळे पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीची जागा अजित पवारांची राष्ट्रवादी लढवेल असं म्हटलं असल्याने आता तेथून उमेदवार कोण असेल याची चर्चा रंगत आहे. मागील वेळेसही या चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे यांनी त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार असल्याचं म्हणत संघर्ष टाळला होता. 2009 पासून सलग 3 टर्म सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत.