Inflation In India: भारतातील महागाई दर 2023 मध्ये 5% राहील, 2024 मध्ये घसरुन 4% होण्याची शक्यता-आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
Inflation (Pic Credit: IANS)

भारतातील महागाई (Inflation In India) हा सध्याचा सर्वाधिक चर्चेचा विषय. या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरही जोरदार चर्चा सुरु असते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (International Monetary) याबाबत भाष्य केले असून, भारतातील महागाईबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. भारतातील महागाई दर (Inflation Rate)31 मार्च रोजी संपलेल्या चालू आर्थिक वर्षात 6.8% वरून पुढील आर्थिक वर्षात 5% पर्यंत खाली येईल आणि त्यानंतर 2024 मध्ये 4% पर्यंत खाली येईल, असे महत्वपूर्ण भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने मंगळवारी केले.

आतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, इतर देशांप्रमाणे भारतातील महागाई 2022 मधील 6.8% वरून 2023 मध्ये 5% पर्यंत खाली येईल अशी स्थिती आहे. तसेच, 2024 मध्ये महागाईचा दर अधिक घसरुन तो 4% इतके लक्ष्य गाठेल, असे आयएमएफचे विभाग प्रमुख डॅनियल ले यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 'वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट' अहवाल नुकताच प्रकाशित केला. त्यानुसार, सुमारे 84% देशांमध्ये 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये कमी शीर्षक (ग्राहक किंमत निर्देशांक) चलनवाढ अपेक्षित आहे. दरम्यान, जागतिक चलनवाढ 2022 मधील 8.8% (वार्षिक सरासरी) वरून 2023 मध्ये 6.6% आणि 2024 मध्ये 4.3% पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

महागाईच्या कमी होण्याच्या बातम्या उत्साहवर्धक आहेत. परंतू, लढाई जिंकण्यापासून त्या बऱ्याच दूर आहेत. अनेक देशांमध्ये नवीन गृहबांधणी मंदावल्याने चलनविषयक धोरणाला धक्का बसू लागला आहे. तरीही, चलनवाढ-समायोजित व्याजदर युरो क्षेत्र आणि इतर अर्थव्यवस्थांमध्ये कमी किंवा अगदी नकारात्मक राहतात. ज्यामुळे अनेक देशांमध्ये चलनविषयक गती आणि परिणामकारकता या दोन्हीबाबत महत्त्वपूर्ण अनिश्चितता पहायला मिळते, असे आंतरराष्ट्री आर्थव्यवस्थेचे अभ्यासक सांगतात.