Mumbai Metro | Representational Image | (Photo Credits: ANI)

India-Pakistan Tension: पुलवामा हल्ल्याचे चोख उत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशातील तणाव काहीसा वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी दिल्ली मेट्रोत (Delhi Metro) रेड अलर्ट जारी करण्यात आला. त्यानंतर आता मुंबई मेट्रोतही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सुरक्षा एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) 12 ही स्थानकांवर रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन मुंबई मेट्रोच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशन, विमानतळे यानंतर मेट्रोच्याही 12 स्थानकांची सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. या प्रसंगात प्रवाशांनी सहकार्य दर्शवावे, असे आवाहन मुंबई मेट्रोकडून करण्यात आले आहे.

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. पुलवामा हल्ल्याचे तोडीस तोड उत्तर देण्यासाठी 26 फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. त्यात 200 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती मिळली आहे. यावर संतापलेल्या पाकिस्तानच्या तीन विमानांनी 27 फेब्रुवारीला सीमा उल्लंघन केले. मात्र भारतीय वायुसेनेची सतर्कता पाहता त्यांनी तेथून ताबडतोब पळ काढला. मात्र भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्तमान पाकिस्तानच्या ताब्यात आहे. या सर्व तणावपूर्ण पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने रेड अलर्टसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत.