
गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांना आयकर विभागाची (Income Tax) नोटीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज (Prithviraj Chavan) चव्हाण यांनाही आयकर विभागाची नोटीस आली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनीच स्वत: ही माहिती दिली आहे. तसेच, या नोटीशीला आपण सविस्तर उत्तर देणार असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, दिवाळीच्या आदल्या दिवशी ही नोटीस आली आहे. तसेच, या नोटीशीला 21 दिवसांमध्ये उत्तर द्यायचे आहे. तसेच माहितीसाठी प्रत्यक्ष हजरही राहायचे आहे. या नोटीशीच्या मार्फत पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे संपत्तीचे गेल्या 10 वर्षापासूनचे विविरण मागविण्यात आले आहे. ही नोटीस म्हणजे आयकर विभागाच्या नेहमीच्या प्रक्रियेचा भाग असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी या नोटीशीनंतर केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. सत्ता कोणाविरुद्ध आणि कशी वापरायची याची नियोजनबद्ध आखणी भाजने केली आहे. त्यानुसारच सर्व काही सुरु असते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही अशीच नोटीस आली होती. आता मलाही अशी नोटीस पाठविण्यात आली आहे.
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, बिहारमध्ये भाजपने नीतीश कुमार यांचे राजकारण संपविण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे. नीतीश कुमार यांचे नेतृत्व खच्ची करण्यासाठी चिराग पासवान यांना खतपणी घालून जाणीवपूर्वक उभे करण्यात आले आहे. चिराग पासवान यांनीही ज्या ठिकाणी नितीश कुमार यांचे उमेदवार उभे असतील त्या ठिकाणी लोजपाचे उमेदवार उभे केले नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे, असेही पृथ्वीराज चव्हाणम्हणाले.