महाराष्ट्रात पुढील 2 दिवसांत उष्णतेची लाट; 43°C पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता
Heatwave | Representational Image | (Photo Credits: PTI)

Heat Wave in Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात तापमानाचा पारा चढत आहे. आज (13 मे) देखील तापमानात प्रचंड वाढ पाहायला मिळाली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या विविध भागांत तापमानात वाढ पाहायला मिळेल. महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 2 दिवसांत उष्णतेची लाट पसरणार असून तापमान 40-43°C पर्यंत राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नाशिक मधील मालेगावात उच्च तापमानाची नोंद झाल्याचे स्कायमेट कडून सांगण्यात आले आहे. हे तापमान सुमारे 43.6°C इतके होते. यामुळे मालेगाव देशातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण ठरलं. त्यानंतर अनुक्रमे 43.4°C आणि  43°C तापमानासह अकोला, जळगाव या जिल्ह्यांचा क्रमांक लागला.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील जळगाव, यवतमाळ, परभणी, नांदेड आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तापमान वाढीची नोंद झाली आहे. उन्हाने तापलेल्या या भारताला थंड करण्यासाठी मान्सूनच्या आगमानाची माहितीही हवामान खात्याने दिली आहे. अंदमान-निकोबार बेटांवर 16 मे पर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Summer Health Tips: उन्हाळ्यात बनवा पुदिन्यापासून बनवलेले 'हे' पेय आणि सन स्ट्रोक पासून करा स्वत:चा बचाव)

मंगळवारी (12 मे) राजस्थान मधील कोटा येथे 45°C तापमानाची नोंद झाली. त्यामुळे कोटा सलग दुसऱ्या दिवशी देशभरातील सर्वाधिक तापमान असलेले शहर ठरले. उष्णतेची लाट देशातील विविध राज्यांत दिसून येणार आहे. तेलंगणा, रायलसीमा, कर्नाटक या भागातही तापमानाच्या पातळीत वाढ होणार आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील 5 दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.