होळी पेटण्याआधीच यंदा महाराष्ट्राच्या अनेक भागात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. सकाळी कडक ऊन आणि रात्री गारवा या विचित्र वातावरणामुळे अनेकजण आजारी पडत असताना आता हवामान खात्याने 7 मार्चपासून पावसाचा अंदाज वर्तवला आहे. संध्याकाळच्या वेळेत पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा आणि सोबत वीजेचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जमिनीवरून वाहणारे कोरडे वारे आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे हे एकत्र आल्याने हा हलका पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
मुंबई शहरामध्ये शुक्रवार 3 मार्च दिवशी कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त नोंदवण्यात आले आहे. आयएमडी कुलाबा आणि सांताक्रुझ मध्ये दिवसा तापमान 33.6 अंश आणि 35.5 नोंदवण्यात आलं आहे. हे सामान्य तापमानापेक्षा 2-3 डिग्री जास्त आहे.
पहा ट्वीट
3 March, IMD Weather Updates:
05 ते 07 मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगाळ आकाश काही भागात.
IMD GFS मोडेल मार्गदर्शन 5-8 March खाली. pic.twitter.com/1yWAYgSTNN
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 3, 2023
सामान्यपणे होलिका दहन झाले की त्यानंतर हळूहळू वसंत ऋतूची चाहूल लागते आणि हवामानातही उष्णता वाढत जाते. पण सध्या वातावरणीय बदलांमुळे सारे ऋतूचक्रचं बदलत आहे. यावर्षी उन्हाळ्याची चाहूल महिनाभर आधीच लागली आहे. त्यामुळे सध्या दिवसा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पण पुढील आठवडाभर या कडाक्याच्या उन्हापासून मात्र सामान्यांची थोडी सुटका होण्याची शक्यता आहे.
6 मार्चला होलिका दहनाचा सण आहे त्यानंतर 7 मार्चला धुलिवंदन आणि 12 मार्चला रंगपंचमी खेळली जाणार आहे. यंदाचा होळीचा सण देखील पावसाच्या सावटाखाली जाणार असल्याचं चित्र आहे.