IIT Powai Security Breach: आयआयटी पवईमध्ये घुसखोरी करून व्याख्यानाला बसलेला युवक पोलिसांच्या ताब्यात

अधिकृत विद्यार्थी नसतानाही आयआयटी बॉम्बे येथे व्याख्यानाला उपस्थित राहताना मंगळुरू येथील एका 22 वर्षीय तरुणाला पकडण्यात आले. तो सुरक्षा तपासणीला टाळून बेकायदेशीरपणे वसतिगृहात राहिला. पवई पोलिस या उल्लंघनाची चौकशी करत आहेत.

IIT Powai Security Breach: आयआयटी पवईमध्ये घुसखोरी करून व्याख्यानाला बसलेला युवक पोलिसांच्या ताब्यात
IIT Mumbai (File Image)

आयआयटी पवई (IIT Bombay) च्या उच्च-सुरक्षिततेच्या परिसरात मोठा सुरक्षाभंग (IIT Powai Security Breach) घडला आहे. मंगळूर, कर्नाटकमधील रहिवासी असलेला बिलाल अहमद फैयाज अहमद तेली Bilal Ahmed Teli) नामक 22 वर्षीय नावाचा युवक कोणतीही अधिकृत परवानगी न घेता संस्थेच्या व्याख्यानात सहभागी झाला होता. तो आयआयटीचा विद्यार्थी नसतानाही तो व्याख्यान हॉलमध्ये बसलेला आढळून आला. ही घटना 17 जून 2025 रोजी उघडकीस आली, जेव्हा तो LH-101 या व्याख्यान हॉलमध्ये बसलेला असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ IIT Quick Response Team (QRT) ने त्याला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी पोवई पोलिसांच्या स्वाधीन केले.

तरुणास घटनास्थळावरुन अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही 4 जून रोजी आयआयटीच्या क्रेडिट विभागातील शिल्पा कोटिकल यांनी अनोळखी व्यक्ती संस्थेच्या कार्यालयात परवानगीशिवाय प्रवेश करत असल्याची तक्रार नोंदवली होती. ओळखपत्र विचारल्यावर तो युवक पळून गेला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरक्षारक्षकांनी शोध घेतला पण त्यावेळी तो सापडला नाही. मात्र 17 जून रोजी दुपारी अंदाजे 4 वाजता कोटिकल यांनी पुन्हा संबंधित व्यक्ती आयआयटी मुंबई येथील व्याख्यान हॉलमध्ये उपस्थित असल्याची माहिती दक्षता विभागाला दिली. यानंतर QRT ने घटनास्थळी जाऊन त्याला अटक केली. (हेही वाचा, Digital Arrest: 'डिजिटल अटक'च्या माध्यमातून आयआयटी-बॉम्बेच्या विद्यार्थ्याची 7 लाखांची फसवणूक)

विद्यार्थी नसतानाही वसतिगृहांमध्ये बेकायदेशीर वास्तव्य

चौकशीत बिलालने कबुल केले की तो आयआयटीचा विद्यार्थी नाही आणि 2 जून ते 7 जून आणि पुन्हा 10 जूनपासून तो आयआयटीच्या विविध वसतिगृहांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास होता. त्यानंतर पोवई पोलिसांनी त्याला नोटीस बजावली असून पुढील चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून त्याने कोणताही सुरक्षेचा धोका निर्माण केला होता का, आणि त्याच्या घुसखोरीचे उद्दिष्ट काय होते, याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IIT Bombay) ही भारतातील एक अग्रगण्य अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था आहे. 1958 साली स्थापन झालेली ही संस्था युनेस्कोच्या मदतीने आणि तत्कालीन सोव्हिएत संघाच्या सहकार्याने उभारण्यात आली होती. मुंबईच्या पवई भागात 550 एकर परिसरात वसलेली ही संस्था शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि नाविन्यपूर्णतेसाठी ओळखली जाते. IIT Bombay मध्ये अभियांत्रिकी, विज्ञान, व्यवस्थापन आणि डिझाईन यांसारख्या विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. येथे Mood Indigo आणि Techfest यांसारखे प्रसिद्ध सांस्कृतिक व तांत्रिक महोत्सवही आयोजित केले जातात, जे देशविदेशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. IIT Bombay चे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असून, ही संस्था भारताच्या शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2025 11:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).