आरक्षण न मिळाल्यास धनगर समाजाचे, पंढरपूर येथे 9 ऑगस्ट पासून आमरण उपोषण
धनगर आरक्षण मुद्दा ऐरणीवर(Archived, edited, images)

मराठा समाजाला आरक्षण (Reservation) मिळाल्यानंतर आता धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याआधी अनेकवेळा सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले आहे मात्र त्यावर अजून ठोस निर्णय झाला नाही. मात्र येत्या आठ ऑगस्टपर्यंत आरक्षण न दिल्यास, 9 तारखेपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पंढरपुरमध्ये (Pandharpur) हे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. पुणे इथे याबाबत पत्रकार परषद पार पडली, त्यामध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली.

आमदार रामराव वडकुते, समितीचे समन्वयक पाडुंरंग मेरगळ, उज्वला हाके, वसुमती गावडे आदी लोकांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी धनगर समाजाच्या नेत्यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला. निवडणुकीच्या तोंडावर 22 योजना आणि एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र समाजातील लोकांपर्यंत ही मदत पोहोचवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. अशाप्रकारे धनगर समाजाची फसवणूक झाली आहे. मात्र आता सरकारने यावर ठोस पावले उचललीच पाहिजेत. (हेही वाचा: अनुसूचित जमातीच्या 22 योजनांचा लाभ आता धनगर समाजालाही मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय)

या लढ्यात राज्यभरातून 5 लाख बांधव पंढरपुरात एकत्र येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशाप्रकारे विधानसभा निवडणूकीवेळी हा मुद्दा चांगलाच चर्चेत येणार आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला मोठ्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. कारण, आरक्षणाचा मुद्दा कितीही सावध आणि राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरेल अशा तऱ्हेने हाताळला तरी, आरक्षणामुळे सामाजिक समतोल साधला जाईलच असे नाही. तसेच या आरक्षणांनतर इतरही समाज आरक्षणासाठी पुढे येऊ शकतात.