हिंगणघाट जळतीकांडतील (Hinganghat Burning Case)पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून सोमवारी 10 फेब्रुवारी सकाळी 6.55 मिनिटांनी पीडिताने नागपुरातील ऑरेंज सिटि रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी अंदोलनही केली जात आहेत. राज्य सरकारने देखील हा खटला जलद गतीने चालवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पीडितेच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील आरोपी विकेश नगराळेने (Vikesh Nagrale) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पीडितेचा मृत्यू झाल्याचे आरोपी विकेश नगराळेला सांगण्यात आल्यानंतर त्याने 'माझ्यामुळे सर्वांना त्रास होत असल्याने मला गोळ्या झाडून मारुन टाका, अशी मागणी केली आहे.पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यातील जनतेने व्यक्त केलेला संताप आणि लोकभावनेच्या दबावामधून आरोपीने अशी मागणी केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
24 वर्षीय शिक्षिका नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. मात्र, 3 फेब्रुवारी रोजी पीडित शिक्षिका कामावर जात असाताना आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत पेटवून दिले होते. यात पीडिता 20 ते 30 भाजली होती. दरम्यान पीडित शिक्षेकेचा चेहरा जळाला होता. त्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. परंतु, सोमवारी 10 फेब्रुवारी सकाळी पीडित शिक्षकेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पीडित तरूणीचा मृत्यू झाल्याची माहिती आरोपीला सांगण्यात आली नव्हती. मात्र, पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती त्याला बुधवारी देण्यात आली. त्यानंतर दैनंदिन झडतीदरम्यान आरोपीने माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय तर, मला गोळी झाडून मारुन टाका अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. हे देखील वाचा- 'हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे' भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी
पीडिताच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली होती. आमच्या मुलीने जे सहन केले, आरोपीची अवस्थाही तिच्याप्रमाणे झाली पाहिजे. त्याला जनसमुदायासमोर बाहेर काढा, त्याच्यावरही हल्ला व्हायला हवा, तेव्हाच तिच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी उद्विग्नता मयत शिक्षिकेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे लग्न झाले असून त्याला 6 महिन्यांची मुलगी आहे. नुकताच तो रेल्वेत नोकरीला लागल्याचे सांगण्यात आले. तीन महिन्यांपूर्वीही त्याने पीडितेला त्रास दिला होता. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावले होते.