Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) जिल्ह्यातून ऑनर किलिंगचे (Honour killing) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 22 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याच्या आरोपावरून तिचे वडील, भाऊ आणि अन्य तीन नातेवाईकांनी तिचा गळा दाबून खून करून तिला जाळून टाकले. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. मुंबईपासून सुमारे 600 किमी अंतरावर असलेल्या लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी महिपाल गावात 22 जानेवारी रोजी झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी पाच जणांना अटक केली.

शुभांगी जोगदंड असे या मुलीचे नाव असून, तिच्या कुटुंबीयांनी तिचा दोरीने गळा आवळून खून केला. नंतर तिला पेटवून दिले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिचे अवशेष नाल्यात फेकले. पीडित महिला बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी (बीएचएमएस) च्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असून, तिचे लग्न निश्चित झाले होते. मात्र, तिने या होणाऱ्या नवऱ्याला तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याचे सांगितले, त्यानंतर ही घटना घडली. हे लग्न मोडल्यानंतर पीडितेचे कुटुंबीय नाराज होते. या घटनेला तथाकथित सामाजिक प्रतिष्ठेशीही जोडले जात आहे. (हेही वाचा: Pune: पुण्यातील तरूणाचा अनोखा कारनामा, स्वतःचे घर आणि कार पेटवून देत गेला नाटक पहायला)

माहितीनुसार, शुभांगी जोगदंडचे वडील, भाऊ, काका आणि चुलत भावाने तिला 22 जानेवारीच्या रात्री शेतात नेले आणि तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी जिथे तिला जाळले होते तिथे शेत नांगरून कांदा पिकाचे बियाणे पेरले. 2,000 लोकसंख्येच्या या गावात घडलेल्या घटनेची कोणालाच माहिती नव्हती. ज्या दिवसापासून शुभांगी बेपत्ता झाली, तेव्हापासून तिच्या वर्गमित्रांना तिचा तपास सुरु केला, मात्र यामध्ये त्यांना संशय आल्याने, एका मैत्रिणीने थेट जिल्हा पोलीस मुख्यालय गाठून तेथील महिला सुरक्षा कक्षात तक्रार दाखल केली. तेव्हा तपासाला वेग आला.

आता अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींना कलम 302 (हत्या) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत, जेणेकरुन ते हत्येतील दोषींना शिक्षा करण्यासाठी सबळ पुरावे गोळा करू शकतील.