Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

हवामान खात्याने (IMD Mumbai) इशारा दिला आहे की, मुंबई परिसरात येत्या चार तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई येथे येत्या चार तासांत मुसळधार तसेच वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत शनिवारी रात्री उशिरा व रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई कार्यालयातील के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

मुंबई परिसरातील खाडींवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे, शनिवार व रविवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे होसाळीकर यांनी सांगितले आहे. या माहितीवरून पश्चिम किनाऱ्यावरील परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात पावसाची संततधार चालूच आहे. अनेक ठिकाणी नद्या, धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाळ्यात मुंबईची हालत तर विचारू नका अशी होते. मात्र महाराष्ट्रातील असा अनेक भाग आहे जो अजूनही कोरडा ठक्क आहे. (हेही वाचा: साकीनाका परिसरातील म्हाडा कॉलनी येथे भिंत कोसळून 1 ठार, 2 जखमी

दरम्यान, हवामान खात्याच्या वेबसाइटनुसार, हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रात शुक्रवारी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांच्या पावसाच्या दरम्यान 43.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या काळात दक्षिण मुंबईतील हवामान केंद्र, कुलाबा येथे 21.2 मिमी पावसाची नोंद झाली.