
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या आठव्या स्मृतिदिनी गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले आहे. कोविड-19 महामारीमुळे दोन वर्षे गोपीनाथगडावर मेळावा होऊ शकला नाही. त्यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर आता प्रथमच गोपीनाथगडावर पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम होत आहे. या वेळी रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन सुरु झाले. कीर्तन संपताच जेवनाच्या पंगती पार पडल्या. या पंगतींमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) जेवणाच्या पंगतीमध्ये जेवण वाढताना दिसल्या.
रामराव ढोक महाराज यांचे गोपीनाथ गडावर कीर्तन पार पडले. या कीर्तनानंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादासाठी उपस्थितांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. या वेळी पंकजा मुंडे यांनी महाप्रसादाच्या पंगतीमध्ये भाविकांना जेवण वाढले. या वेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. (हेही वाचा, Gopinath Munde Death Anniversary: गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन; पंकजा मुंडे गोपीनाथगडावरुन काय बोलणार? कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता)
गोपीनात मुंडे स्मृती दिनाचे औचित्य साधत आज गोपीनाथगडावर अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा आणि प्रीतम यांनीही गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांचे दर्शन घेतले. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही गोपीनाथ गडावर जाऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आजच्या कार्यक्रमाची कालच पाहणी केली. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भविष्यातील आपल्या राजकारणाची दिशा कशी असेल त्याबाबत आपण संकल्प करणार आहोत. दोन वर्षे गोपीनाथगडावर यायला जमले नव्हते. कोरोनाचे सावट होते. मात्र, यंदाच्या वर्षी यायला मिळत आहे. त्यामुळे माझी भविष्यातील भूमिका काय आणि कशी असेल याबाबत कार्यकर्त्यांसमोर बोलेन, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. मला न बोलताही कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे कळते. त्यामुळे मी आणि माझे कार्यकर्ते यांचा भविष्यातील प्रवास कसा असेल याबाबत संकल्प करणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.