
कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संकेत दिले आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता राज्यातील विविध शहरात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर शाब्दिक हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. यातच अमरावती (Amravati) येथे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या राज्यात अव्वल होती. त्यानंतर जिल्ह्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. याआधी जिल्ह्यात दररोज 950 रुग्ण आढळून येत होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे ही रुग्णसंख्या 300 वर आली आहे. हे देखील वाचा- Pune Mini Lockdown: पुण्यात आजपासून पुढील 7 दिवस मिनी लॉकडाऊन, काय बंद राहणार आणि काय मुभा मिळणार?; वाचा सविस्तर
औरंगाबादमध्ये काल (2 एप्रिल) 1 हजार 427 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या 85 हजार 587 वर पोहचली आहे. यापैकी 68 हजार 366 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 1 हजार 737 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 15 हजार 484 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
तसेच जिल्ह्यातील 28 लाख नागरिकांपैकी 1 लाख 39 हजार 398 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. जिल्ह्यात 1 लाख 23 हजार 701 नागरिकांनी पहिला डोस घेतला तर 15 हजार 697 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.