Ganeshotsav 2019: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक विस्कळीत; कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मनस्ताप
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI/File)

गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2019)  चाहूल लागताच मुंबईकर चाकरमान्यांचे पाय आपोआप कोकणाकडे वळतात. गणेशाच्या आगमनाला अवघे 24 तास शिल्लक असताना मिळेल त्या मार्गाने गावी पोहचण्यासाठी सर्वांची धडपड सुरु असते. अशातच रेल्वेला तुफान गर्दी असल्यामुळे शेवटच्या क्षणी प्रवासासाठी रस्ते वाहतुकीचा मार्ग निवडला जातो. कोकणात जाण्याचा सर्वात सोप्पा पर्याय म्हणजे मुंबई गोवा महामार्ग (Mumbai- Goa Highway), मात्र दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे, तसेच रस्त्यातील खड्ड्यांमुळे या मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचे समजत आहे. याशिवाय आज सकाळी 7  च्या सुमारास वडपाले (Vadpale)  गावाजवळ एक एसटी बस जळून खाक झाली. परिणामी, वाहतुकीचा वेग मंदावला असून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या 2 ते 3  किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पेण ते ईरवाडी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, तर वाकण ते कोलाड आणि इंदापूर ते माणगावपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, आज सकाळी परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे जाणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागली होती, यामध्ये सुदैवाने प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली मात्र वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. एकीकडे या अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. तर दुसरीकडे, या महामार्गावरील वाहनांची संख्या देखील तितकीच जास्त असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, सध्यस्थितीत वाहतुकीचा वेग अजूनही मंदावला आहे. याप्रमाणेच मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील पुण्याकडील मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली आहे.