Ganesh Chaturthi 2022: यंदाच्या गणेशोत्सवामध्ये नसतील Plaster of Paris च्या मूर्ती; BMC ने केले स्पष्ट
Ganesh Idol (Photo Credits-ANI)

अवघ्या काही आठवड्यांवर गणपती उत्सव (Ganeshotsav 2022) येऊन ठेपला आहे. यंदा 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2022) आहे. अशात मुंबईतील गणेश चतुर्थी उत्सवापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सार्वजनिक गणेश उत्सव समारंभ समितीसोबत झालेल्या बैठकीत, यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती (PoP Idols) नसतील असे सांगितले आहे. याबाबत नागरी प्रमुख इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले की, ‘या वर्षी आम्ही एक अॅडव्हायझरी जारी केली आहे परंतु पुढच्या वर्षीपासून शिक्षा देखील होईल.’

मिडडे मधील वृत्तानुसार, गणपती उत्सवादरम्यान पीओपी मूर्ती विकताना आढळल्यास त्याला दंड आणि न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल. मे 2020 मध्ये, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्तींसाठी PoP वापरण्यावर बंदी घालणारी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे जलस्रोतांमध्ये गंभीर प्रदूषण होत असल्याचे त्यामध्ये म्हटले होते.

परंतु या मार्गदर्शक तत्वानंतर मूर्ती विक्रेत्यांनी आपली रोजीरोटी गमावण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर वर्षभरासाठी ही बंदी पुढे ढकलण्यात आली. आता दोन वर्षांनंतर अखेर पालिकेने नियमाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस पाठवली आहे. परंतु यावर्षीही अल्पावधीत दोन कोटींहून अधिक मातीच्या मूर्ती बनवणे शक्य नसल्याचा दावा करत मूर्तीकरांनी पुन्हा बीएमसीवर आक्षेप नोंदवला. समन्वय समितीने याबाबत चहल यांना पत्रही लिहिले आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र पोलीस भरती, सात हजार पदे; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची महत्त्वपूर्ण माहिती, घ्या जाणून)

सोमवारी, समितीची नागरी प्रमुखांसोबत बैठक झाली, जिथे बीएमसी प्रशासनाने पीओपी क्रिस्टलच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. यासह या बैठकीमध्ये चहल यांनी मूर्तींच्या उंचीवर कोणत्याही मर्यादा नसतील परंतु मूर्ती पर्यावरण पूरकच असाव्यात असे नमूद केले. या बैठकीला शिवसेनेचे आमदार अजय चौधरी, माजी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते. समन्वय समितीने नागरी प्राधिकरणाला कोणत्याही घातक पदार्थाशिवाय पीओपी वापरण्यास परवानगी देण्याचे आवाहन केले आहे.