गडचिरोली जिल्ह्यात भूतांचे वास्तव्य? रात्री अचानक पडतो दगडांचा पाऊस; नागरिकांमध्ये भीतीचे सावट तर पोलीस झाले हतबल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

जसा देव आहे तसा दानवही आहे, जशा चांगल्या गोष्टी घडतात तशा वाईटही घडतात. भारताला लाभलेली परंपरा आणि संस्कृती पाहता इथले लोक भूत पिशाच्च अशा अनेक गोष्टींवर विश्वास ठेवत असलेले दिसत आहेत. काही जागा तर भुताटकी जागा म्हणून ओळखल्या जातात. असेच गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात भूतांचे वास्तव्य असल्याची अफवा पसरत आहे. जिल्ह्यातील आरमोरी (Armori) येथील आझाद चौकात गेल्या आठ दिवसांपासून रात्री दगडे पडण्याची घटना घडत आहे. या गोष्टीमुळे गावात भीतीचे सावट पसरले असून, या गावाला भुताने झपाटले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

रात्रीच्या सुमारास अचानक एका चौकात तुफान दगडफेक होते. या दगडफेकीत घरांची कौल फुटतात व इतरही नुकसान होते. ही घटना नेमकी कशी घडते याचा उलगडा अजूनही न झाल्याने, या प्रकाराबाबत गावात इतकी भीती निर्माण झाली आहे. गावातील अनेक कुटुंबांनी स्थलांतरही केले आहे. हा प्रकार भुताटकी आहे असे समजून लोकांनी जागरणे करायला सुरुवात केली मात्र काहीच हाती लागले नाही. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले, रस्त्यावर लाईट्स बसवल्या. त्यातूनही काही शोध लागला नाही. आता हे दगड कुठून व कसे पडतात हे पाहण्यासाठी या चौकात मोठी गर्दी होत असते. (हेही वाचा: ही आहेत भारतातील शापित पर्यटनस्थळे; पुण्यातील हे भुताटकी ठिकाण तर आहे जगप्रसिद्ध)

अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी गावातीलच कोणी माथेफिरू हे करत असावा हे लक्षात आले. ही गोष्ट त्यांनी नागरिकांना समजावून सांगितली व लवकरच तो पकडला जाईल असे आश्वासनही दिले. दरम्यान, दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातीलच कोटगूल येथे आश्रमशाळेत भूत-पिशाच्च असल्याच्या अफवेमुळे विद्यार्थ्यांनी शाळा सोडली आहे. एका मांत्रिकाने शाळेत भूत असल्याचे सांगितले होते, त्यानात्यार सगळे विद्यार्थी सुट्टी घेऊन घरी गेले आहेत.