Gadchiroli News: व्हिडिओ बनवताना हत्तीच्या पायाखाली चिरडून वन विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू
Elephant | Representational image (Photo Credits: pxhere)

Elephant Attack: गडचिरोली वन विभागातील एका कर्मचाऱ्याचा हत्तीच्या पायदळी तुडवला गेल्याेन मृत्यू झाला आहे. सुधाकर आत्राम (Sudhakar B Atram) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पळसगाव (Palasgaon Forest) परिसरात हत्ती घुसल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार हत्तीला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परतविण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील होते. या वेळी वनविभागाच्या वाहनाचे चालक असलेले सुधाकर आत्राम हे हत्तीला हुसकावून लावतानाचे व्हिडिओ चित्रिकरण करत होते. दरम्यान, बिथरलेला हत्ती आत्राम यांच्या दिशेने आला. त्यांना बचावाची संधीच न मिळाल्याने हत्तीने त्यांना पायाखाली चिडरले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

वाहनचालक सुधाकर आत्राम यांनी आपले सरकारी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले होते. वन विभागाचे कर्मचारी हत्तीला हुसकावून लावत असताना ते या घटनेचे चित्रीकरण करत होते. दरम्यान, हत्ती जवळ आल्याने इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे ते बचावासाठी धावू लागले. मात्र, धावताना ते पाय घसरुन पडले आणि हत्तीच्या पायाखाली आले. त्यानंतर हत्तीने त्यांना चिरडून ठार केले.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आत्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. गेल्या काही वर्षांत ओडिशातील हत्ती महाराष्ट्रात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याच्या घटना घडत आहेत. ही घटनाही त्यापैकीच एक आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी सुद्धा जंगली हत्तीच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. त्याही वेळी हत्तीच्या पायदळी चिरडले गेल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. अशा घटनांमुळे वनविभागाने हत्तींचे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी स्थानिक रहिवाशांना वन्य प्राण्यांच्या जवळ जाण्याचे टाळण्याचा इशाराही दिला आहे.