सर्वोच्च न्यायालयाने काल (10 सप्टेंबर) दुपारी मराठा आरक्षण प्रकरणावर सुनावणी करत महाराष्ट्र राज्यात नोकरी आणि शिक्षणामध्ये असलेल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणली आहे. यामुळे आता राज्यातील यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये मराठा आरक्षण समाविष्ट नसेल. त्याचा परिणाम अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश 2020-21 वर देखील झाला आहे. आज (10 सप्टेंबर) रोजी जाहीर होणारी 11 प्रवेशाची दुसरी मेरीट लिस्ट (FYJC 2nd Merit List) जाहीर झालेली नाही. तिला पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्वीट करत त्याची माहिती दिली आहे. Maratha Reservation: मराठा समाजाच्या उमेदवारांना शिक्षण आणि नोकरी मध्ये देण्यात येणार्या एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालया कडून स्थगिती.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, SEBC आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही पुढे ढकलण्यात येत आहे. पुढील कार्यवाहीचे वेळापत्रक शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्वीट
Following Hon'ble SC's order (on SEBC reservation), declaration of allotment list for Round 2 of Class XI online admission process 2020-21, which was to be announced on Sept 10, has been postponed until further notice. A revised list will be declared after Govt. approval.
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) September 10, 2020
महाराष्ट्रात यंदा कोरोना संकटामुळे आधीच दहावीचा निकाल उशिरा लागला आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया देखील लांबली आहे. 30 ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान संबंधित कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत जे प्रवेश मराठा आरक्षण अंतर्गत झाले आहेत. ते तसेच ठेवले जाणार की रद्द केले जाणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.