सध्या राज्यात कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकार झटत आहे. या दरम्यान सरकारला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी माहिती मिळत होती की राज्यात फक्त काही दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा (Blood) उपलब्ध आहे. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेला रक्तदान (Blood Donation) करण्याचे आवाहन केले होते. आता राज्यात शनिवार, 12 डिसेंबर पासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात आरोग्यमंत्री श्री. टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान केले.
याआधी राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोना काळातील निर्बंधामुळे महाविद्यालये बंद आहेत. अनेक कार्यालयांमध्ये 'वर्क फ्रॉम होम' सुरू आहे, त्यामुळे रक्तसंकलनात मोठीच अडचण निर्माण झाली. रक्तपेढ्यांना रक्तपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या पातळीवर निर्धाराने पेलण्याचे ठरवले होते. त्यामुळेच राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना, संबंधित जिल्हाशल्य चिकित्सक आणि संबंधित रक्तपेढ्यांना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या होत्या. (हेही वाचा: Shakti Law: महिलांसह मुलांवरील अत्याचाराला शक्ती कायद्यामुळे बसणार चाप, आरोपीला होणार 2 वर्षांची शिक्षा)
राज्यात शनिवार (१२ डिसेंबर) पासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची घोषणा.
राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने आयोजित #रक्तदान शिबिरात आरोग्यमंत्री श्री. टोपे व खासदार @supriya_sule यांनी केले रक्तदान. pic.twitter.com/Y4k5B2Ssiu
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 10, 2020
कोरोनाकाळात मागच्या आठ महिन्यात राज्यात होणारे रक्तदान मंदावल्याने आरोग्य क्षेत्राला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. म्हणूनच सुरु केलेल्या रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी 800 रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राजेश टोपे व सुप्रिया सुळे यांनी रक्तदान केले.
दरम्यान, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 13 ते 20 डिसेंबर दरम्यान स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार असून, त्यानिमित्त प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी रक्तदान करून रूग्णांना नवजीवन देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन टोपे यांनी केले आहे.