Palghar Mob Lynching: पालघर मधील मॉब लिंचिंग प्रकरणात आखणी 5 जणांना अटक
Representational Image (Photo Credits: Facebook)

पालघर (Palghar) जिल्ह्यात 16 एप्रिलला दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला चोर समजून त्यांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. या तिहेरी हत्याकांडामुळे सर्वत्र खळबळ उडाल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच सरकारने या मॉब लिंचिंग (Mob Lynching) प्रकरणाला कोणत्याही धर्मचे रुप देऊ नये असे आवाहन केले होते. पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात यापूर्वी 110 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणी आतापर्यंत 115 जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती पालघर जिल्ह्याच्या पोलिसांकडून देण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांना कोर्टात सुद्धा सादर केले जाणार आहे.

पालघर येथे एका गाडीतून दोन साधू आणि त्यांचा ड्राइव्हर प्रवास करत होते. त्यावेळी दाभाडी-खानवेल रोडवर तब्बल 200 आदिवसांच्या जमावाने वाहन थांबवून त्यांना खाली उतरवले. त्यानंतर जमावाने तिघांची चौकशी न करता मारहाण आणि दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या मृत्यू झाला. तर मृत्यू पावलेल्या व्यक्तींमध्ये सुशीलगिरी महाराज (वय 30), चिकणे महाराज कल्पवृक्ष गिरी (वय 70) आणि त्यांचा चालक निलेश तेलवडे (वय 30) यांचा समावेश आहे. या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पालघर मधील घटनेतील आरोपींना शक्य तितकी कठोर शिक्षा होईल असे स्पष्ट केले आहे.(सर्वांना एकच कायदा; लॉक डाऊनचा नियम मोडून मुंबईहून सांगलीकडे येत असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल)

दरम्यान, पालघर मॉब लिंचिंग प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यासंदर्भात बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. तत्पूर्वी या प्रकरणाचा तपास पोलिसांनी CID कडे सोपविला आहे. तर CID यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.