दिल्लीमधील केंद्रीय सचिवालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये गृह मंत्रालयाच्या (MHA) कार्यालयात दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने केलेल्या पुष्टीनुसार अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी रवाना करून आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन दलाच्या वरिष्ठ (डीएफएस) अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना मंगळवारी (16 एप्रिल) सकाळी 9.35 वाजता घडली.
राजधानी दिल्लीमध्ये कडाक्याचा उन्हाळा आहे. तापमान मोठ्या प्रमाणावर चढेच आहे. अशा वेळी, घर, उपहारगृह अथवा कार्यालयांना आग लागण्याच्या घटना घडत आहेत. गृहमंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आगही अशाच काही कारणामुळे लागली असावी का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आगीचे नेमेके कारण समजू शकले नाही. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पुढच्या काहीच वेळात आग आटोक्यात आणण्या आली.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग एसी युनिटमधून लागली आणि त्यामुळे परिसरातील एसी युनिट, संगणक, कागदपत्रे आणि फर्निचरचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. अधिकारी सध्या आगीच्या कारणाचा तपास करत आहेत आणि किती नुकसान झाले याचा अंदाज घेत आहेत.