Arnab Goswami (Photo Credits-Twitter)

रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे (Republic TV) मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी आज सकाळी आठ वाजता त्यांच्या घरातून अटक केली. दोन वर्षे जुन्या प्रकरणामध्ये, सीआरपीसीच्या कलम 173 (8) अन्वये आयपीसीच्या कलम 306 आणि 34 अन्वये त्यांना अटक करण्यात आली होती. हे गोष्ट शांत होतेय ना होतेय तोपर्यंत आता अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी पोलिस पथक मुंबईत त्यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा एका महिला पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा अर्नब गोस्वामी यांच्यावर आरोप आहे.

अर्नब यांना अटक करण्यात आलेले प्रकरण 2 वर्षे जुने आहे. 5 मे 2018 रोजी मुंबईतील 53 वर्षांचे इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने स्वतःचे जीवन संपवले होते. अन्वय नाईक यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये तीन जणांची नावे लिहिली होती. त्या सुसाइड  नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचेही नाव होते. याशिवाय फिरोज शेख आणि नितीश सारडा यांचीही नावे होती. या प्रकरणात आज अर्नब गोस्वामी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. मात्र सकाळी जेव्हा पोलिसांची टीम अर्नब यांना अटक करण्यासाठी त्यांची घरी गेली, तेव्हा अर्नब यांनी एका महिला पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा: रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्नब गोस्वामी यांना अटक)

एएनआय ट्वीट -

आता याच बाबतीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुसरीकडे अर्णब गोस्वामी यांनी पोलिसांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. रिपब्लिक टीव्ही वाहिनीने दाखविलेल्या व्हिडिओमध्ये अर्णब यांनी सांगितले आहे की, प्रदीप पाटील यांच्यासह 8 पोलिसांनी त्यांना शिवीगाळ केली व मारहाण केली. व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, जेव्हा मला घरातून उचलले गेले तेव्हा माझ्या पायात चप्पलही नव्हती. या व्हिडिओमध्ये अर्णब आपल्या हाताला झालेली जखमही दाखवत आहेत.