Representational Image (Photo Credits: PTI)

Mumbai-Pune Highway Accident: राज्यात सध्या अपघातांमध्ये मोठी वाढ होत आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Highway) खडकी रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. एसटी बसने एका चारचाकी कारला समोरून दिलेल्या धडकेत भूमिअभिलेख विभागात उपअधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याचा मृत्य झाला. महिला अधिकारी पुढच्या काचेवर आदळल्याने ती जागीच ठार झाली. मृत महिलेशिवाय तिचे पती, भाऊ, आणि बसमधील अन्य प्रवासी असे चौदा जण जखमी झाले आहेत. (हेही वाचा: Shivshahi Accident : अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा अपघात; एकाचा मृत्यू, 25 जखमी )

मनीषा भोसले असे मृत्यू महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी बस चालकावर कारवाई करण्यात आली आहे. बसचालक अनंत पंजाबराव उईके याला ताब्यात घेण्यात आले आहे. आपघातावेळी एसटी बसमधून बारा प्रवासी प्रवास करत होते. ही बस नारायणगाव आगाराची होती. खडकी परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही लेन बंद आहेत. अपघात झालेली वाहने एकाच लेनमधून जात होती. त्यावेळी हा अपघात झाला.(Pune Bangalore Highway Accident: पुणे-बंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भोसले या शासकीय अधिकारी होत्या. त्यांचे पतीदेखील शासकीय खात्यात नोकरीला आहेत. नुकतीच मनीषा यांची पलूस येथून पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे बदली झाली होती. त्यांनी हडपसरमध्ये घर भाड्याने घेतले होते. घरातील सामान शिफ्टिंगचे काम सुरू होते. मनीषा या पतीसह चिखलीत भावाकडे आल्या होत्या. रविवारी सकाळी त्या चारचाकी गाडीने हडपसरकडे निघाल्या होत्या. त्यांचा भाऊ गाडी चालवित होता, तर पती समोरच्या सीटवर बसले होते.

मनीषा या ड्रायव्हर सिटच्या पाठीमागे बसल्या होत्या. खडकी रेल्वे स्टेशन परिसरात त्यांची गाडी आली असता, एसटी बसने त्यांच्या चारचाकी गाडीला समोरून धडक दिली. त्यामध्ये गाडीतील तिघे जखमी झाले. मनीषा या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचे पती आणि भावावर उपाचार सुरू आहेत.