औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने 30 वर्षीय शेतक-याची गळफास लावून आत्महत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (फोटो सौजन्य- Pixabay, Open Clip Art)

परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला चांगलेच झोडपले आहे. यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहे, तर अनेकांच्या फळबागा, शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान इतके मोठे आहे की ते भरून काढता येण्यासारखे नाही. अशा परिस्थितीत बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या 30 वर्षीय शेतक-याने गळफास (Farmers Suicide) लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. औरंगाबादेतील ओमेरगा (Omerga) तालुक्यातील कादेर (Kader) गावात ही घटना उघडकीस आली आहे. मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने येथील एका शेतक-याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

मृत शेतक-याच्या शवाजवळ तशा पद्धतीची सुसाइड नोट सापडली आहे. ज्यात त्या शेतक-याने अतिवृष्टीमुळे त्याच्या सोयाबीनच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि त्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत असे म्हटले आहे. शिवाजी जाधव असे या मृत शेतक-याचे नाव आहे.

हेदेखील वाचा- महाराष्ट्रात अतिवृष्टी नुकसान झालेल्यांना मदतीची प्रतिक्षा; अजित पवारांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाच्या बैठक आणि महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या नातेवाईकांनी त्याने शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. ओमेरगाचे पोलिस निरीक्षक एस के शेख याबाबत अधिक तपास करत आहे.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटी सुरु झालेल्या परतीच्या पावसाने महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात चांगलाच जोर धरला. यामुळे पुणे, औरंगाबाद, नागपूर, मराठवाड्यात शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर, नांदेड, पंढरपूर, उस्मानाबाद येथे ऊस, कापूस आणि सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढून हवालदिल झालेल्या शेतक-यांची मदत करावी अशी मागणी होताना दिसत आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये आर्थिक पॅकेज वर चर्चा करून त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेली स्थिती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. केंद्र सरकार मदतीचा हात पुढे करेल असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला आहे.