Death PC PIXABAY

शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी केल्यावर त्वचेवाटे विषबाधा झालेल्या 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रोहित बाबासाहेब थेटे असे मृत तरुणाचे नाव असून हा आई- वडील व पत्नीसोबत सावखेडगंगा शिवारात शेतवस्तीवर राहतो. रविवारी रोहित शेतातील पिकावर विषारी औषध फवारणी करण्यासाठी गेला होता. शेतामध्ये औषध फवारत असताना त्वचेवाटे औषध शरीरात गेल्याने त्याला विषबाधा झाली.  (हेही वाचा - Social Media Influencer Goes Missing In Pune: पुण्यात लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर Mayuri Pawar बेपत्ता; घरात सापडली सुसाईड नोट, लाखो लोक करतात फॉलो)

विषबाधा झालेल्या रोहितला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने थेटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी विरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

शेतात किटकनाशके फवारण्याआधी त्यासोबत दिलेले माहितीपत्रक जरुर वाचून घ्यावे. ज्यामध्ये औषध हाताळताना काळजी घेण्याबाबत महत्वाच्या सूचना केलेल्या असतात. औषध फवारणी करताना संपूर्ण अंग झाकतील असे जाड कपडे, गॉगल, तोंडाला मास्क, पायात मोठे बूट प्रामुख्याने वापरावे. औषध फवारणी पूर्ण होईपर्यंत धुम्रपान करणे किंवा काहीही खाणे टाळावे. औषध फवारणी झाल्यानंतर अंघोळ करुनच खाणे- पिणे करावे.  औषध फवारणीनंतर कोणताही त्रास जाणवू लागल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.