Fake Job Scam Kalyan: रेल्वे संरक्षण दल (RPF) जवान असल्याची बतावणी करणाऱ्या 22 वर्षीय तरुणास रेल्वे पोलिसांनी अटक (RPF Jawan Arrest) केली आहे. या अटकेमुळे महाराष्ट्रात एक बनावट नोकरी घोटाळा (Fake Job Scam) घडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील रोहन उतेकर असे या व्यक्तीचे नाव असून तो गुरुवारी एक्स्प्रेस ट्रेनमधून विना तिकीट प्रवास करताना पकडला गेला. पोलिसांनी सांगितले की, त्याने आरपीएफ गणवेश सदृश्य पोशाख घातला होता. जेव्हा तिकीट तपासनीसाने उतेकरला तिकीट काढण्यास सांगितले, तेव्हा त्याने आपण आरपीएफ जवान असल्याचा दावा केला आणि एक ओळखपत्र सादर केले, जे नंतर बनावट असल्याचे आढळून आले. त्याला तातडीने अटक करण्यात आली.
खोटी नाकरी, खोटे प्रशिक्षण आणि वैद्यकीय तपासणीही खोटी
वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे पोलिसांच्या पथकाने उतेकर यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान, उतेकरने बनावट आरपीएफ नोकर भरती रॅकेट चालवणाऱ्या टोळीबद्दल माहिती दिली. या टोळीने महाराष्ट्रातील जवळपास 100 तरुणांची फसवणूक केली आहे. तसेच, त्या माध्यमातून कोट्यवधी रुपये उकळल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. उतेकर याने पोलिसांकडे केलेल्या धक्कादायक खुलाशात सांगितले की, मुंबईतील एका व्यक्तीने आरपीएफमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याच्या आणि इतर तरुणांच्या कुटुंबातील इतर आठ सदस्यांकडून 6 लाख रुपये घेतले होते. नोकरी मिळाल्याचे खरे वाटावे आणि कोणासही संशय येऊ नये यासाठी उतेकरला बिहार आणि इतर ठिकाणी तीन महिन्यांसाठी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. इतकेच नव्हे तर कोलकाता येथे त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. (हेही वाचा, New Mumbai: रेल्वेत नोकरीच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक; डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल)
पोलिसांकडून तपासास सुरुवात
अधिकाऱ्यांनी सांगितले की, उतेकर अहमदनगरमधील एका खासगी पोलिस प्रशिक्षण संस्थेच्या संचालकाच्या माध्यमातून मुंबईतील व्यक्तीच्या संपर्कात आला. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस आता उतेकर यांनी दिलेल्या माहितीचा वापर करत आहेत. अटकेमुळे अशा फसव्या कारवायांमुळे अधिक लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी नोकर भरती प्रक्रियेत दक्षता आणि पडताळणी वाढवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, राज्यामध्ये वेगवेगळ्या घोटाळ्यांनी डोके वर काढले आहे. नीट परीक्षा घोटाळा राज्यात गाजत असतानाच राज्यसवेतील इतर भरती मध्येही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. या घोटाळेबाजांची तपासणी करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी सर्व स्तरातून पुढे येत आहे. राज्य सरकार त्यावर काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे.