Mumbai Police Sion Branch | (Photo Credit: X)

प्राप्तिकर विभागातील (Income Tax Department) अधिकारी असल्याचे भासवून मुंबई येथील सायन परिसरातील एका व्यवसायिकाच्या घरी बनावट छापा (Fake Income Tax Raid) टाकणाऱ्या तोतया टोळीचा पोलिसांनी (Mumbai Police) पर्दाफाश केला आहे. धक्कादायक म्हणजे प्राप्तिकर अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या आरोपींच्या तोतया टोळीने व्यावसायिकाची तब्बल 18 लाख रुपयांची लूट केली होती. या प्रकरणात तातडीने कारवाई करत शीव पोलिसांनी आठ जणांना अटक केल आहे. श्रीलता पटवा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपींकडे प्राप्तिकर विभागाचे ओळखपत्र

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबरच्या सकाळी 11 च्या सुमारास चार जणांची एक टोळी तक्रारदार श्रीलता पटवा यांच्या घरी पोहोचली. त्यांनी आपण प्राप्तिकर अधिकारी असल्याचे सांगून घरात प्रवेश मिळवला. तोतयांनी या वेळी स्वत:चे ओळखपत्रही दाखवले. ज्यामुळे पटवा आणि त्यांच्या कुटुंबाचाही काही काळ यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर या तोतयांनी पटवा कुटुंबातील सर्वांचे मोबाईल काढून घेत त्यांना घरातील एका खोलीत बसवून ठवले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण घराची झडतील घेतली. तसेच, तुमच्याकडील रोख रक्कम आणि दागिने बाहेर काढून ठेवा, असे फर्मान आरोपींनी सोडले. घारबरलेल्या कुटुंबीयांनी सर्व दागिने आणि रक्कम काढून दिली. (हेही वाचा, प्रसिद्ध उद्योजक हणमंतराव गायकवाड यांच्या BVG Group कार्यालयावर आयकर विभागाचे छापे)

तक्रारदाराच्या मुलासोबत आरोपींचा पोबारा

आपण रचलेला बनाव खरा वाटावा यासाठी आरोपींनी पटवा कुटुंबीयांची कागदपत्रेही तपासली. त्यानंतर तुम्हाला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येईल. त्याला उत्तर द्या असे सांगून त्यांनी ती रोख रक्कम आणि दागिने सोबत नेले. तसेच, कायदेशीर पूर्ततेसाठी त्यांनी पटवा यांच्या मुलालाही सोबत घेतले आणि आरोपींनी पोबारा केला. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे पुढे येताच पटवा यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला आणि तपास सुरु केला.

आरोपींच्या कटात तक्रारदाराच्या मुलाचा मित्र

धक्कादायक म्हणजे आरोपींच्या कटात पटवा यांच्या मुलाचा मित्रच असल्याचे आढळून आले. त्यानेच आरोपींना माहिती दिली होती. पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक केली. तसेच, गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारगाडीही त्यांनी जप्त केली.

आरोपींची नावे

  1. संतोष पटले (वय 37)
  2. राजराम मांगले (वय 47)
  3. अमरदीप सोनावणे (वय 29)
  4. भाऊराव इंगळे(वय 52)
  5. सुशांत लोहार(वय 33)
  6. शरद एकावडे (33)
  7. अभय कासले (31)
  8. रामकुमार गुजर (38)

एक्स पोस्ट

गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांनी पुढच्या अवघ्या 48 तासांमध्ये आरोपींना अटक केली. यामध्ये तोतया अधिकारी म्हणून फिरणाऱ्या तसेच माहिती देणाऱ्या आणि पैसे स्वीकारणाऱ्या आरोपींचा समावेश आहे, असे उपायुक्त (परिमंडळ-४) प्रशांत कदम यांनी सांगितले.