मोबाईलचा स्फोट (संग्रहित संपादित प्रतिमा)

नुकताच कोल्हापूर (Kolhapur) येथे मोबाइलचा स्फोट (Mobile Blast) होऊन एका मुलाने आपला डोळा गमावल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा नाशिक (Nashik) येथे असाच मोबाईलचा स्फोट होऊन घरातील अनेक गोष्टींचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या मोरवाडी परिसरात घरात चार्जिंगला लावलेल्या फोनचा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये घरातील अनेक गोष्टी जळाल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल आव्हाड असे या मोबाईल मालकाचे नाव आहे. त्यांच्याकडे MI हा फोन असून, त्यांनी हा फोन घरात चार्जिंगला लावला होता. अचानक या फोनचा स्फोट झाला, यामुळे संपूर्ण घरात धूर पसरला होता. स्फोट झाल्यानंतर प्रसंगावधान ओळखून ताबडतोब राहुलने हा फोन बाहेर फेकला. मात्र या दरम्यान घरातील अनेक गोष्टी जळाल्याने वस्तूंचे नुकसान झाले आहे.

(हेही वाचा: गेम खेळताना मोबाईलचा स्फोट; आठ वर्षांच्या मुलाने गमावला हात)

दरम्यान, सध्या अशाप्रकारे मोबाईलचा स्फोट होण्याचे प्रमाण फार वाढले आहे. कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेमध्ये या मुलाने आपला डोळा गमावला होता. त्याआधी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या साकीनाका, खैराणी रोड येथील रॉयल फेब्रिकेशन या कारखान्यातील एका कामगाराच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाला होता. तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (Ambernath) येथील कोहोजगार गाव परिसरात IPhone 6 चा स्फोट झाल्याने एक तरुण जखमी झाला होता.