EVM Machine Stolen | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

EVM Machine Issue: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Eletion 2024) दुसऱ्या टप्यात आज देशभरात मतदान पार पडत आहे. सकाळपासून नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी करत आहेत. अशातच हिंगणघाटमध्ये दोन तास ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. हिंगणघाट तालुक्यातील चानकी येथील बूथ क्रमांक 314 वर हा प्रकार घडला आहे. दुसरीकडे यवतमाळमध्ये देखील ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील हुडी बुद्रुक येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. गेल्या दीड तासांपासून ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. त्यामुळे मतदारांची गैरसोय झाली आहे. (हेही वाचा :SC Rejects EVM-VVPAT Verification Plea : ईव्हीएमद्वारेच होणार मतदान; सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट पत्रिकांच्या १०० टक्के पडताळणीची फेटाळली याचिका)

चानकी मतदान केंद्रावर सकाळी 10 वाजता ईव्हीएम मशीन बंद पडले होते. ते 12 वाजता सुरु झाले. चानकी येथे 1178 मतदार आहेत. मशीन बंद होण्यापूर्वी फक्त 118 नागरिकांनी मतदान केले होते. काहीवेळा पूर्वी तेथे मतदान सुरु झाले असून मतदान केंद्रावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आज सकाळपासून वर्धा जिल्ह्यातील देवळी, कारंजा, वर्धा आणि हिंगणघाट या चार ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या होत्या. ईव्हीएम दुरूस्तीनंतर या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदारांना पुन्हा मतदान करण्यासाठी बोलावले जात आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण 1997 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या मतदार संघात भाजपाचे रामदास तडस (ramdas tadas) आणि शरद पवार गटाचे अमर काळे (amar kale) यांच्यात लढत होत आहे.