परेल आणि एल्फिन्स्टन स्टेशनला (Elphinstone Road Station) जोडणारा मुंबईतील पादचारी रेल्वे पुलावर 29 सप्टेंबर 2017 रोजी घडलेली दुर्घटना ही अक्षरश: मन सुन्न करणारी होती. या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 23 लोकांनी आपले प्राण गमावले, तर 33 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते. त्या दिवसाची आठवण जरी झाली तर अंगावर काटा उभा राहतो. अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला हा एल्फिस्टन पूल (सध्याचा प्रभादेवी) आता कायमचा बंद होणार असून त्या जागी येत्या 6 महिन्यात नवीन पूल उभारण्यात येणार आहे.
प्रभादेवीचा (Prabhadevi) हा पूल 47 वर्ष जुना असून 1972 मध्ये हा उभारण्यात आला होता. 2017 मध्ये या पूलावर झालेली चेंगराचेंगरी ही संपूर्ण प्रशासनासाठी एक चपराक होती. आणि म्हणूनच भविष्यात असे अपघात होऊ नये यासाठी हा मृत्यूचा सापळा ठरलेला हा पूल बंद करण्यात येणार असून त्या जागी 6 मीटर रुंद असा नवीन पुल उभारण्यात येणार आहे.
या नवीन पुलावर सरकते जिनेही जोडण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. मटा ने दिलेल्या बातमीनुसार, प्रभादेवी स्थानकातील दादर दिशेकडील पुलाचा भाग तोडण्यात येणार असून नवीन पुल मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडण्यात येणार आहे.