खुशखबर! वीज कर्मचा-यांना बाप्पा पावला, पगारात होणार 32 टक्क्यांनी वाढ
Representational Image (Photo credits: PTI)

दु:ख हर्ता बाप्पा यंदा महाराष्ट्रातील वीज कर्मचा-यांसाठी(Electricity Staff) सुखवार्ता घेऊन आलाय. राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांच्या कर्मचा-यांच्या मूळ वेतनात 32.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, 5 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती अशा तीनही कंपन्यांतील कर्मचा-यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 32.50 टक्के जास्त वेतनवाढ मिळणार आहे. तर इतर विविध भत्त्यांमध्ये 100% वाढ करण्यात येणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील एकूण 95,000 कर्मचा-यांना होणार आहे.

राज्यातील वीज कर्मचा-यांच्या पगारवाढी संदर्भात गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यावर समाधानकारक तोडगा काढत सरकारने मूळ वेतनामध्ये 32.50% पगारवाढीसोबत 125% महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये समाविष्ट करण्यात येईल. तांत्रिक व अन्य साहाय्यक प्रवर्गाच्या कर्मचा-यांच्या पगारात वाढ करण्यात आली असून त्यांना पहिल्या वर्षी 15 हजार, दुस-या वर्षी 16 हजार तर तिस-या वर्षी 17 हजार रुपये एवढी पगारवाढ मिळेल. हेही वाचा- सरकारी कर्माचाऱ्यांनी ऑफिसात सकाळी 9 वाजता हजेरी लावावी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदेश

याशिवाय कंत्राटी कामगारांना वेतनाशिवाय 20 टक्के अतिरिक्त वाढ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वर्ग 4 च्या तांत्रिक कर्मचा-यांच्या मूळ वेतनामध्ये 500 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. त्यासोबतच या वीज कर्मचा-यांना वाहनांच्या वापराप्रमाणे पेट्रोल भत्ताही देण्यात येणार आहे.

कर्मचारी अपघात विमा योजना व ग्रुप टर्म इन्शुरन्स विम्याची रक्कम 10 लाखांवरून 20 लाखांपर्यत करण्यात आली आहे. तसेच मीटर रिडिंग करता वाहनाने जाणा-या कर्मचा-यांना वाहनाच्या वापराप्रमाणे पेट्रोल भत्ता मिळणार आहे.