
राज्यातील कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव पाहता, तो रोखण्याच्या अनुषंगाने राज्यात जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान प्रस्तावित असलेल्या 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती राज्य शासनामार्फत राज्य निवडणूक आयोगास नुकतीच करण्यात आली होती. आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. निवडणुकीदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास, त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, वोटींग मशिनचा सामुदायिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकत्र येण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी धोकादायक ठरु शकते व त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील 6 महिने कोणत्याही निवडणुका न घेण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशी विनंती राज्य शासनामार्फत राज्य निवडणुक आयोगास करण्यात आली होती, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. (हेही वाचा: लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 22 हजार 484 गुन्ह्यांची नोंद; 23 हजार 820 व्यक्तींना अटक)
दरम्यान, राज्य शासनाच्या विनंतीस मान्य करून राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे की, जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनाही त्या ज्या टप्प्यावर असतील त्याच टप्प्यावर, पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. ज्या ग्रामपंचायतींची 5 वर्षांची मुदत संपेल तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता, त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करण्याची दक्षता घ्यावी, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. तसेच राज्य निवडणूक आयोग वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन व आवश्यकतेनुसार राज्य शासनाशी सल्लामसलत करुन निवडणुकांवरील स्थगिती उठविण्याबाबत व निवडणुका घेण्याबाबत निर्णय घेईल, असेही आयोगाने कळविले आहे.