Drunk Driving: वाइन पिऊन गाडी चालवल्यास अटक होऊ शकते? जाणून घ्या काय म्हणतात Mumbai Police
Drunken driving (Photo Credits: Pixabay)

मुंबई पोलीस (Mumbai Police) अनेकदा आपल्या ट्विटर हँडलवरून वापरकर्त्यांच्या चित्र-विचित्र प्रश्नांना मनोरंजक उत्तरे देत असतात. अनेकदा त्यांची अशी उत्तरे व्हायरलही झाली आहेत. आताही त्यांनी एका यूजरच्या एका प्रश्नाला असेच भन्नाट उत्तर दिले आहे, ज्याबाबत चर्चा आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने नवीन वाइन (Wine) धोरण आणले आहे, याअंतर्गत लोक आता जनरल स्टोअर्स आणि सुपरमार्केटमध्येही वाईन खरेदी करू शकतात. या धोरणाचे समर्थन करत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते की, वाइन म्हणजे दारू नाही आणि वाइनची विक्री जास्त झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.

याच मुद्द्यावरून एका युजरने मुंबई पोलिसांना गंमतीत विचारले की, 'मी वाइन पिऊन गाडी चालवताना पकडलो तर मुंबई पोलीस मला जवळच्या बारमध्ये घेऊन जातील की जेलमध्ये बंद करतील?’ शिवम वाहिया नावाच्या युजरने ट्विटरवर हा विचारला आहे.

या प्रश्नाला मुंबई पोलिसांनी अतिशय मजेदार आणि अचूक उत्तर दिले. शिवमला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी लिहिले, ‘सर, एक जबाबदार नागरिक म्हणून मद्यपान करून बारमधून बाहेर पडल्यावर चॉफर असलेल्या गाडीतून प्रवास करा. अन्यथा, तुम्ही प्यालेल्या वाईनमध्ये ब्रेथलायझरला अल्कोहोलचे प्रमाण आढळले, तर तुम्हाला बारमागे आमचे पाहुणे व्हावे लागेल. मुंबई पोलिसांचे हे उत्तरादाखल केलेले ट्वीट व्हायरल होत आहे.

दरम्यान, सरकारने वाइनबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत भाजपचा विरोध तीव्र होऊ लागल्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दारू आणि वाइनमधील फरक सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी वाइन ही दारू नसल्याचे सांगितले होते. यावरूनच युजरने मुंबई पोलिसांना हा प्रश्न विचारला होता.

राज्यातील वाइन उद्योग पुढील वर्षापर्यंत 1000 कोटी लिटरपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या राज्यात वर्षाला 70 लाख लिटर वाईनची विक्री होते. या धोरणाविरोधात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा हा निर्णय आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. महाराष्ट्राला मद्य राष्ट्र होऊ देणार नाही, असे ते म्हणाले आहेत. त्यांनी ट्विट करून सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून सरकारने एकाही गरीब किंवा शेतकर्‍यांना मदत केली नाही, मात्र त्यांच्यासाठी दारूला प्राधान्य आहे.