Sameer Wankhede | (Photo Credits: ANI)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची आर्यन खान ड्रग प्रकरणातून (Aryan Khan Drug Case) हकालपट्टी करण्यात आली आहे. याप्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी आर्यन खान प्रकरणासह इतर पाच प्रकरणांची चौकशी करेल. ही सारी प्रकरणे आधी वानखेडे हाताळत होते. संजय सिंह हे NCB चे उपमहासंचालक (ऑपरेशन्स) आहेत. आता दिल्ली एनसीबीची एक टीम उद्या मुंबईत पोहोचत आहे. आर्यन खान प्रकरणासह मुंबई झोनमधील इतर सहा प्रकरणांची या पथकाकडून चौकशी करण्यात येणार आहे.

या 6 प्रकरणांमध्ये नवाब मलिक यांचा जावई समीर खान, अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्स प्रकरणाचा समावेश आहे. वानखेडे यांनी याबाबतच्या आपल्या स्पष्टीकरणात एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘मला या प्रकरणांच्या चौकशीतून हटवण्यात आलेले नाही. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी माझी न्यायालयात रिट याचिका होती. त्यामुळे दिल्ली एनसीबीची एसआयटी आर्यन आणि समीर खान प्रकरणाची चौकशी करणार आहे. दिल्ली आणि मुंबई एनसीबी एकमेकांच्या समन्वयाने या प्रकरणांची तपासणी करेल.’

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना काढून टाकल्याबद्दल, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक आणि शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही फक्त सुरुवात असल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात, ‘यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी खूप काही करावे लागेल जे आम्ही करू.’ (हेही वाचा: Narayan Rane On Shiv Sena: 'दिल्लीला धडक माराल तर डोके जाग्यावर राहणार नाही', नारायण राणे यांची शिवसेनेवर टीका)

एनसीबीने नुकतीच एक प्रेस नोट जारी केली आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, 'कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या भूमिकेतून काढून टाकण्यात आलेले नाही. कोणतेही विशिष्ट आदेश जारी होईपर्यंत ते ऑपरेशन्स शाखेच्या तपासाला आवश्यकतेनुसार मदत करत राहतील. एनसीबी संपूर्ण भारतात एकल एकात्मिक एजन्सी म्हणून कार्य करते.' यावरून समीर वानखेडे हे अजूनही या ड्रग्ज प्रकारण्यात असल्याचे दिसून येते.

दरम्यान, आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह इतरांना एनसीबीने 2 ऑक्टोबरच्या रात्री क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतले आणि दुसऱ्याच दिवशी अटक केली. यानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. समीर वानखेडेवर वसुलीचेही आरोप झाले होते. नुकतेच समीर यांनी आपली जात लपवल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.