डॉ. प्रकाश आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे (Dr. Sheetal Amte) यांचे आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळी वळणं घेत आहेत. यात आता चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक अरविंद साळवे (Arvind Salve) यांनी पत्रकार परिषद घेऊन एक नवा खुलासा केला आहे. यामध्ये डॉ. शीतल आमटे यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्राथमिक अहवालात हा निष्कर्ष उघड करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण एक वेगळंच वळण घेत आहे. दरम्यान डॉ. शीतल आमटे यांच्या सासरच्या लोकांनी आमटे कुटूंबियांवर देखील अनेक आरोप-प्रत्यारोप केले होते.
जून 2020 मध्ये डॉ. शीतल यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा नवी अधिकृत माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली. डॉ. शीतल आमटे यांनी कुत्र्यांना देण्यासाठी नागपूरमधील फार्मसिस्टकडून इंजेक्शन्स मागवली होती. ही इंजेक्शन्स अॅनेस्थेशिया श्रेणीतील आहेत. शीतल यांनी मागवलेल्या पाच इंजेक्शन्सपैकी एक शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत मिळालेले होते, असे यापूर्वी समोर आले होते.हेदेखील वाचा- Dr. Sheetal Amte Suicide: डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्युनंतर सुप्रिया सुळे, नितीन राऊत, अतुल भातखळकर, रक्षा खडसे, रोहित पवार यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया
दरम्यान अद्याप टॅब-मोबाईल-लॅपटॉप यांचा प्रयोगशाळा अहवाल प्रलंबित आहे. त्याशिवाय व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत आहेत. विविध अहवाल अद्याप प्रतिक्षेत असल्याने मृत्यूबाबत निष्कर्ष काढणे शक्य नसल्याची माहिती साळवे यांनी दिली.
ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबरला आत्महत्या केली. त्यांनी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी विषारी इंजेक्शन टोचून आयुष्य संपवलं. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने आमटे परिवारासह सर्वांनाच धक्का बसला होता.