डोंबिवली: नमो रमो ट्रॉफी 2020 स्पर्धेच्या पोस्टरवरील मजकूरानंतर वाद; क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलली
प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty Images)

डोंबिवलीमध्ये युवा आशापुरा मित्र मंडळाकडून आयोजित नमो रमो ट्रॉफी (Namo Ramo Trophy 2020)  ही क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवर फक्त गुजराती, कच्छी आणि मारवाडी खेळाडूच सहभागी होऊ शकतील असं छापण्यात आल्याने नवा वाद रंगला आहे. सध्या हे पोस्टर सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. दरम्यान पोस्टरवर भाजपा आमदार रविंद्र चव्हाण (MLA Ravindra Chavan)  यांचा फोटो असल्याने मराठी लोकांनी अजूनच संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार या क्रिकेट स्पर्धेशी रविंद्र चव्हाण यांचा किंवा भाजपचा कोणताही संबध नाही अशी बाजू स्थानिक भाजपा नेत्यांनी मांडली आहे. 'आमदार रविंद्र चव्हाण आमच्या मंडळाच्या विविध कार्यक्रमांना आर्थिक मदत करत असल्यामुळे या क्रिक्रेट स्पर्धेच्या पोस्टरवर त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता, मात्र या स्पर्धेशी त्यांचा काहीही संबध नाही, असे हिरल या आयोजकांनी मटाला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे. आता वादग्रस्त पोस्टरमुळे या स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्यात आलं आहे.

पोस्टरवर दिलेल्या माहितीप्रमाणे नमो रमो ट्रॉफी ही क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदाच डोबिंवलीमध्ये आयोजित केली होती. यामध्ये अंडरआर्म प्रकारातील स्पर्धा होती. मात्र सध्या पोस्टरवरून वाद रंगल्याने डोंबिवलीमध्ये जागोजागी लावलेले पोस्टर्स काढून टाकण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मराठी विरूद्ध इतर समाज असा वाद रंगलेला पाहिला आहे. आता बहुसंख्य मराठी लोकांची वस्ती असणार्‍या डोंबिवली सारख्या शहरामध्ये आता त्यांनाच हद्दपार करणार्‍या स्पर्धेचं आयोजन आणि तशाप्रकारची पोस्टर्स लावण्यात आल्याने काहींनी आपली नाराजी व्यक्त केली होती.