याआधी मुंबईसह (Mumbai) परिसरात लोकांना पाळीव कुत्र्यांनी (Pet Dogs) चावा घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र आता आपल्या पाळीव कुत्र्याच्या आक्रमकतेबाबत त्यांच्या मालकाने सावध राहण्याची गरज आहे. मुंबईतील गिरगाव न्यायालयाने एका व्यावसायिकाला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या व्यावसायिकाच्या पाळीव कुत्र्याने एका व्यक्तीचा चावा घेतला होता. घटनेच्या 12 वर्षांनंतर न्यायालयाचा हा निर्णय आला आहे.
रिपोर्ट्सनुसार, दोषीच्या पाळीव कुत्र्याने 12 वर्षांपूर्वी एका माणसाला चावा घेतला होता, त्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. अशा आक्रमक कुत्र्यासोबत बाहेर जाताना योग्य ती काळजी घेतली नाही, तर ते जनतेसाठी निश्चितच घातक आहे, असा निकाल न्यायालयाने दिला. अशा कुत्र्यांमुळे सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने कुत्र्याचा मालक सायरस पर्सी हॉर्मुसजी (44) यांना भारतीय दंड संहिता कलम 289 (प्राण्यांबाबत निष्काळजी वर्तन) आणि 337 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या कृत्यामुळे दुखापत करणे) अंतर्गत गुन्ह्यासाठी दोषी ठरवले. ही घटना मे 2010 मध्ये घडली होती जेव्हा पीडित केरसी इराणी आणि होर्मुसजी हे मुंबईतील नेपियन सी रोडवर त्यांच्या कारजवळ उभे राहून मालमत्तेच्या प्रकरणाबाबत वाद घालत होते.
त्यावे होर्मुसजींचा पाळीव कुत्रा गाडीच्या आत होता आणि गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. फिर्यादीने सांगितले की, कारचा दरवाजा न उघडण्याची विनंती करूनही आरोपीने (होर्मौसजी) दरवाजा उघडला, ज्यामुळे कुत्रा बाहेर आला आणि त्याने थेट पीडितेवर (इराणी) हल्ला केला. कुत्र्याने दोनदा इराणीच्या उजव्या पायाला आणि एकदा उजव्या हाताला चावा घेतला. त्यानंतर इराणीने याबाबत तक्रार दाखल केली होती. (हेही वाचा: Mumbai: दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 25 वर्षीय अरबी भाषेच्या शिक्षकाला अटक)
आता न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आरोपीला माहित होते की हा कुत्रा अतिशय आक्रमक जातीचा आहे. तरीही त्याने गाडीचा दरवाजा उघडून त्याला बाहेर येण्यास परवानगी दिली. त्यामुळे या प्रकरणात होर्मौसजीला दोषी ठरवून त्याला 3 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.