Diwali Holidays: महाराष्ट्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांना मिळणार दिवाळीची सुट्टी; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
Education Minister Varsha Gaikwad (PC - MahaDGIPR)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन लागू करण्यात आला होता. या काळात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी सरकारने ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरु केली आहे. सध्या देशात ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. आता महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी (Diwali Holidays) मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे व त्या संबंधिचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे गायकवाड यांनी आज माध्यम प्रतिनिधींसोबत अनौपचारिक चर्चा करतांना सांगितले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू ठेवले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी व त्यांचे ज्ञानभांडार समृद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील राहील, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. (हेही वाचा: राज्य सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात उद्यापासून सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स उघडण्यास परवानगी)

अकरावी महाविद्यालय प्रवेश संदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाधिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरच अकरावी महाविद्यालयाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. कॉलेज सुरू व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे परंतु ऑनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे याबद्दल गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले. दुसरीकडे सरकारने कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसही जाहीर केला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून BEST कर्मचार्‍यांना यंदा 10,100 रूपये बोनस जाहीर केला आहे. तर सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर देण्यात येणारे एकरकमी लाभ दिवाळीच्या आधी मिळणार आहेत.