बेस्ट कर्मचाऱ्यांची (BEST Employee) यंदाची दिवाळी (Diwali 2021) अगदी 'बेस्ट' ठरणार आहे. बीएमसी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने दिवाळी बोनस देण्याची मागणी बेस्ट कर्मचाऱ्यांनी केली होती. आता महापौर किशोरी पेडणेकर, बेस्टचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली आहे. यंदा बीएमसी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 20,000 रुपये बोनस दिला जाणार आहे. यामुळे पालिकेतील 94 हजार तर बेस्ट उपक्रमाच्या 32 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. पालिकेच्या तिजोरीवर अडीशे कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बोजा पडणार आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच योग्य तो निर्णय जाहीर केला जाईल, असे आश्वासन महापौरांनी 'बेस्ट' कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांना दिले. त्याच आधारावर आता बोनस जाहीर करण्यात आला आहे. बीएमसीएवढा बोनस जाहीर केल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. बोनसमध्ये 4500 रुपयांनी वाढ केल्याबद्दलही बीएमसी आणि बेस्ट युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि बीएमसी आयुक्तांचे आभार मानले आहेत.
एड. देवदास म्हणाले की, आम्हाला 22 हजार रुपयांची अपेक्षा होती, पण जे मिळाले त्यात आम्ही आनंदी आहोत. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही काही बोनस मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर बीएमसीच्या 1 लाख 11 हजार कर्मचाऱ्यांना 15,500 रुपयांचा बोनस मिळाला होता. (हेही वाचा: Maharashtra: वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यापासून हेल्मेट, सीटबेल्ट न लावल्यास 1 हजार रुपयांचा दंड)
यंदा असा मिळेल बोनस –
बीएमसी कर्मचारी- ₹20,000
बेस्ट कर्मचारी- ₹20,000
शिक्षक वर्ग- ₹10,000
आरोग्य कर्मचारी- ₹5300
शिक्षण सेवक- ₹2800
पार्ट टाइम वर्कर- ₹2800
दरम्यान, पुढील फेब्रुवारीमध्ये बीएमसीच्या निवडणुका होणार असल्याने कर्मचाऱ्यांना नाखूष ठेवणे पालिकेला परवडणारे नाही. म्हणूनच पालिकेने यांना बोनसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. ठाणे महापालिकेने 15,500 रुपये बोनस दिले आहे.