धुळे महानगरपालिका निवडणूक 2018: सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50 टक्के मतदान, धक्कादायक निकालाची शक्यता
Voting | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Dhule Municipal Corporation Election 2018: धुळे महापालिकेसाठी (Dhule Municipal Corporation) शहरातील मतदारांनी मतदानासाठी हिरीरीने सहभाग नोंदवला.  मात्र, मतदानासाठी सुरवातीला पाहायला मिळालेला उत्साह दुपारनंतर फारसा पाहायला मिळाला नाही.  हाती आलेल्या माहितीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत  एकूण 50 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावाला. महत्त्वाचे म्हणजे,  महापालिकेच्या इतिहासत पहिल्यांदाच तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावाल. विशेष असे की, या तृतीयपंथीयांच्या आयुष्यात मतदान करण्याची ही पहिलीच वेळ होती. आज (रविवार, 9 डिसेंबर) सकाळी 7.30 वाजता सुरु झालेले मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत पार पडले.

प्राप्त माहितीनुसार, सकाळी आकरा वाजेपर्यंत सुमारे 11 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 25 टक्क्यांपर्यंत पोहोचली. तर, दुपारी साडेतीनपर्यंत 35 टक्के मतदारांननी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, या वेळी एकूण 13 तृतीयपंथी मतदारांपैकी 9 तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

धुळे महानगर पालिकेसाठी एकूण 19 प्रभाग आहेत. तर एकूण सदस्य संख्या आहे 74. या निवडणुकीसाठी एकूण 3 लाख 29 हजार 569 मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. यात 1 लाख 74 हजार 696 पुरुष मतदार होते तर, महिला मतदार - 1 लाख 54 हजार 860. तृतीयपंथी मतदारांची संख्या होती 13. (हेही वाचा, धुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला)

दरम्यान, धुळे महानगरपालिका निवडणूकीत ७४ जागांसाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आघाडीने ७४, भाजपने ६२, शिवसेनेने ५०, लोकसंग्राम पक्षाने ६०, ‘रासप’ने १२, ‘एमआयएमए’ने १२, समाजवादी पार्टीने १२ उमेदवार दिले आहेत.