28 मे रोजी राज्यात बारावीचा निकाल (12th Results 2019) लागला. विद्यार्थ्यांनी अतिशय घवघवीत यश मिळवत राज्यात 85.88% विद्यार्थी पास झाले. यंदा बारावीच्या परीक्षेला एकूण 14,21,936 विद्यार्थी बसले होते. मात्र यापैकी अनेकांच्या गुणांमध्ये मोठा घोळ झाला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. परिक्षा मंडळाकडून डाटा फिडींगमध्ये त्रुटी राहिल्याने ही बाब समोर आली आहे. त्यामुळे मुंबईच्या अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल, औषध निर्माण, आर्किटेक्चर व तत्सम शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे अवघड ठरणार आहे.
याप्रकरणात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्ष घातले असून, याबाबत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी जेईई, जेईई ॲडव्हान्स यांसारख्या स्पर्धा परीक्षा दिल्या, त्यामध्ये त्यांना अतिशय उत्तम गुण प्राप्त झाले आहेत. मात्र महाराष्ट्र मंडळाकडून जी एचएससीची परीक्षा घेण्यात आली, त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना महत्वाच्या विषयांमध्ये 50 पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. म्हणूनच विज्ञान शाखेतील निकालात तब्बल 3.5% नी घट झाली आहे. (हेही वाचा: (हेही वाचा: रिंकू राजगुरु हिची बारावीच्या परीक्षेत 'सैराट' कामगिरी; पहा किती टक्के मिळाले गुण)
याबाबत गेले दोन दिवस पालक आणि विद्यार्थी महामंडळाशी संपर्क साधत आहेत, मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. अखेर धनंजय मुंडे याबाबतीत पुढाकार घेणार आहेत. दरम्यान बारावीच्या निकालामध्ये अशा त्रुटी राहिल्याने आतापर्यंत 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर अनेकांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.