महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला आज ( 8 सप्टेंबर) लोणावळा जवळ अपघात झाला आहे. मुंबईच्या दिशेला निघालेल्या धनंजय मुंडे यांच्या गाडीच्या ताफ्यातील एका गाडीचा टायर फुटला. त्यानंतर पाठीमागे असलेल्या काही गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. या दुर्दैवी प्रकारामध्ये कोणलाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र 2 जणांना किरकोळ स्वरूपाचा मार आणि जखम झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे आज सकाळी मुंबईकडे जाण्यास निघाले होते. धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या ताफ्यातील एका गाडीचा टायर अचानक फुटला. अचानक घडलेल्या या प्रकारामध्ये मागील गाड्यांना त्यांचा वेग सावरता आला नाही आणि गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातामध्ये वाहन चालक, सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. तर धनंजय मुंडे सुखरूप आहेत. सध्या या प्रकाराचा तपास लोणावळा पोलीस करत आहेत.
धनंजय मुंडे याच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याचे समजताच मीडीयामध्ये काही उलट सुलट चर्चा रंगायला सुरूवात झाली होती मात्र अपघातानंतर सारे सुखरूप आहेत. कोणत्याही अफवा पसरवू नयेत तसेच खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आले आहे.