Jalyukt Shivar Yojna: जलयुक्त शिवारची चौकशी जरूर करावी, देवेंद्र फडणवीसांचे राज्य सरकारला प्रत्युत्तर
Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची (Jalyukt Shivar Yojna) SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या योजनेची चौकशी व्हावी अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून नेत्यांकडून होत होती. चौकशीच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत वाढ होणार असे बोलले जात होते. मात्र यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेची अवश्य चौकशी करावी अशा शब्दांत राज्य सरकारला प्रत्युत्तर दिले आहे. उस्मानाबादच्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'जी काही चौकशी करायची असेल ती त्यांनी जरुर करावी. यातील कोणतेही काम मंत्रालयातून मंजूर झालेले नाही. स्थानिक पातळीवर टेंडर काढून ही कामे झाली आहे. सहा लाखांवर ही कामे झाली आहेत. त्यात 700 तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक चौकशी लावण्यात आली असून अशा चौकशांनी विरोधी पक्षनेत्यांचे तोंड बंद करता येईल असे वाटत असेल तर तसं होणार नाही' असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.  'जलयुक्त 'शिव्या'र'; देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी योजनेवरुन राज ठाकरेंचे फटकारे

त्याचबरोबर कोरोना संपला की, प्रत्येक गावात जाऊन शेतक-यांना जलयुक्त शिवाराचा किती फायदा झाला याबाबत शेतक-यांचे मत नोंदवून त्याचे प्रदर्शनच घडवणार आहोत असेही ते यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते. त्याच धर्तीवर ही चौकशी होणार आहे. या योजनेसाठी 10 कोटी खर्च झाला मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. यामुळे या योजनेतील मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर येईल असे विरोधकांचे म्हणणे आहे.