Devendra Fadnavis Recovered From COVID19 (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोरोनावर (COVID-19) मात केली आहे. तसेच ते पुढील 8 दिवस होम क्वारंटाईन राहणार असल्याची माहिती त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली आहे. त्यांना 24 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. स्वत: त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सेंट जार्ज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, दहा दिवसानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयाच्या बाहेर येताच फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादनही केले आहे. त्यावेळी भाजप अनेक कार्यकर्ते त्याठिकाणी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने बिहार विधानसभा निवडणूक 2020 ची जबाबदारी टाकली होती. त्यामुळे निवडणूक प्रभारी म्हणून फडणीस हे गेले काही काळ बिहारच्या दौऱ्यावर होते. बिहार दौऱ्यावरुन परतलेल्या फडणवीस यांनी लगेच महाराष्ट्रतील विविध ठिकाणी दौरे केले. या दौऱ्यांमध्ये त्यांनी राज्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी केली होती. त्यानंतर विविध ठिकाणी पत्रकार परिषदाही घेतल्या होत्या. याचदरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी फडणवीस यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती सर्वांनाच चिंतेत पाडले होते. हे देखील वाचा- Anil Parab on Arnab Goswami: भाजपचा पोपट पिंजऱ्यात बंद, अर्नब गोस्वामी प्रकरणावर अनिल परब यांची प्रतिक्रिया

अमृता फडणवीस यांचे ट्वीट-

कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. दरम्यान, सर्वसामान्यांपासून तर अनेक राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, खेळाडूदेखील कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता हे सर्वजणांनी कोरोनावर मात केली आहे.