Photo credit -X

Puja Khedkar Probe: निलंबीत ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या अंतरिम जामीनासाठीच्या याचिकेवर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. सुनावणीत हायकोर्टाने पूजा खेडकरला मोठा धक्का दिला आहे. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात पूजा खेडकर हिने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. ट्राल कोर्टाने पूजा खेडकर हिला अंतरिम जामीन देण्याचा नकार दिला होता. त्यानंतर पूजा खेडकर हिने या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. (Puja Khedkar Case: 'पूजा खेडकरचे अपंगत्वाचे दावे खोटे, प्रमाणपत्रात बदलले नाव'; दिल्ली पोलिसांच्या स्टेटस रिपोर्टमध्ये व्यक्त केला संशय)

मात्र ही याचिका फेटाळण्यात आल्याने आता पूजा खेडकर हिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कुठल्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होऊ शकते. आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने सांगितले की, याचिकाकर्त्याचं आचरण हे समाजातील वंचित समुहांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे.

मात्र त्या वंचित समुहांसाठीच्या तरतुदींचा लाभ घेण्यास पात्र नसल्याचे तपासामधून दिसून येत आहे. आलिशान वाहनांचे मालक असण्याबरोबरच याचिकाकर्त्याचे आई-वडील प्रभावशाली आहेत, असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने काही निरिक्षण नोंदवली. (Pooja Khedkar Case: पूजा खेडकर हिमनगाचे टोक; अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी रॅकेट; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल)

हायकोर्टाने म्हटले की, पूजा खेडकर हिने उचलेली पावलं ही व्यवस्थेत फेरफार करण्याच्या एका मोठ्या कटाचा भाग होती. लाखो विद्यार्थी यूपीएसएसी परीक्षेसाठी उपस्थित असतात. या परिस्थितीत तिच्याकडून वापरण्यात आलेली रणनीती अनेक प्रश्न उपस्थित करते. फसवणुकीचं हे उदाहरण केवळ घटनात्मक संस्थाच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक करणारे आहे, असे हायकोर्टाने म्हटले.

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी चौकशीची आवश्यकत आहे. तसेच याचिकाकर्त्याविरोधात एक भक्कम खटला उभार राहू शकतो, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे, असे सांगत कोर्टाने पूजा खेडकर हिची याचिका फेटाळून लावली. पूजा खेडकर हिच्यावर फसवणूक करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा तसेच ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचा आरोप आहे.