Darshana Pawar, Rahul Handore | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Rahul Handore Arrested: महाराष्ट्रात खळबळ उडालेल्या MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणातील (Darshana Pawar Death Case) मुख्य आरोपी राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले आणि नंतर त्याला अटक केल्याचे समजते. राहुल हंडोरे यांच्यावर दर्शना पवार (Darshana Pawar) हिच्या हत्येचा आरोप आहे. या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाठिमागील अनेक दिवसांपासून राहुल हा पोलिसांना हवा होता. मात्र, तो गुंगारा देऊन फरार झाला होता. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून दर्शना पवार हत्या प्रकरणात बरीच माहिती हाती लागणार आहे.

दर्शना पवार ही एमपीएससी उत्तीर्ण झाली होती. एमपीएससी उत्तीर्ण झाल्यावर दर्शना पवार हिची वनअधिकारी पदी निवड सुद्धा झाली होती. तिला ट्रेकींगची आवड होती. तसेच, आरोपी राहुल हंडोरे आणि दर्शना पाठिमागील प्रदीर्घ काळापासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्यात मैत्री होती. दरम्यान, दर्शना हिने आपल्याशी लग्न करावे अशी राहुलची इच्छा होती. मात्र, दोघांच्याही घरातून विरोध होता. त्यातच दर्शना हिचा विवाह कुटुंबीयांनी दुसऱ्याच मुलासोबत ठरवल्याचा राहुलला राग होता. त्यातूनच त्याने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या माहितीची पुष्टी होऊ शकली नाही. (हेही वाचा, Darshana Pawar Last Speech: दर्शना पवारच्या शेवटच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; म्हणाली, 'प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते...' (Watch Video))

दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे दोघे 12 जून रोजी राजगडावर फिरायला गेले होते. मात्र, त्यानंतर ती कोणालाच दिसली नाही. राहुल आणि दर्शना राजगडावर जाताना एसा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत होते. मात्र, राजगडावरुन परतताना ती त्याच्यासोबत दिसत नव्हती. दुसऱ्या बाजूला दर्शना बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये दिली होती. एमपीएससीमध्ये उत्तर्ण झालेबद्दल दर्शना हिचा पुण्यात सत्कार होता. या सत्कारासाठी म्हणून गेलेली दर्शना परत आलीच नाही, असे तिच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले होते.

दर्शना पवार हिच्या हत्येसंदर्भात पोलिसांना राहुल याच्यावर संशय होता. मात्र, तो फरार असल्याने तो नेमका कोठे आहे याबाबत माहिती मिळत नव्हती. दोन दिवसांपूर्वीच त्याने दिल्ली येथील एटीएममधून पैसे काढल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर त्याचे पुढचे लोकेशन कोलकाता येथेही आढळून आले. इतकेच नव्हे तर तो फोनच्या माध्यमातून नातेवाईकांशी बोलल्याचेही आढळून आले होते.